सोलापूर – अक्कलकोट रोडवरील रविवार पेठ परिसरातील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये घरगुती वीज पुरवठ्यावरुन थेट व्यावसायिक दुकानाला वीज पुरवठा करुन मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महावितरणकडे तक्रार करुनही संबंधितांवर कठोर कारवाई न करता उलट नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानाला महावितरणचे स्वतंत्र मीटर नव्हते. घरगुती मीटरवरुनच पूर्णपणे कमर्शियल वापरासाठी वीज घेतली जात होती. दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने हा प्रकार नागरिकांच्या सहज नजरेस पडत होता. याबाबतची माहिती महावितरण कंपनीला देण्यात आल्यानंतर कविता नगरी उपविभागातील अभियंता गुरव व इतर कर्मचारी यांनी दि. १२ मे २०२६ रोजी स्वप्नशिल्प अपार्टमेंट येथे भेट देऊन पाहणी केली होती.
पाहणी दरम्यान संबंधित ठिकाणी “तीन ग्राहक” १२६ अंतर्गत वीज चोरी आढळून आल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. उलट संबंधित ग्राहकाला नवीन अधिकृत वीज कनेक्शन देऊन जागेवर मीटर बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “वीज चोरी प्रकरण दाबण्यात आले का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरात संबंधित ग्राहकाकडून “महावितरण कर्मचाऱ्यांना पैसे देऊन विषय मिटवला असून आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही,” अशा प्रकारची उघड चर्चा होत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करावी, तसेच वीज चोरी प्रकरण दडपण्यामागील नेमके कारण शोधावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.