
सोलापूर – निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित इंटर क्लब क्रिकेट स्पर्धेचा पुष्प जिमखाना, डोणगाव रोड या क्रीडांगणावर उत्साहात शुभारंभ झाला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील वयोगटातील एकूण ७ संघांचा समावेश असून, ८४ खेळाडू रंगीत पोषाखात सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन १४ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट संघटना निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे आणि दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार संगवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष विकेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती निलेश गायकवाड यांनी दिली. सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले. आभार विनोद पाटील यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल मित्रे, दीपक सुरवसे, वाल्मिक कीर्तीकर व आनंद पाटील परिश्रम घेत आहेत.
ईगल्सचा २ गडी राखून विजय
सकाळच्या सत्रातील पहिला सामना एनजीसीए लॉयन्स विरुद्ध एनजीसीए ईगल्स यांच्यात झाला. ईगल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लॉयन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ३० षटकांत सर्वबाद २१७ धावा केल्या. यामध्ये हर्ष राऊतने ६१, रणवीर सिंग बुमराने ५४, सुरज थोरातने ३१ आणि सुजल गायकवाडने १५ धावा केल्या. ईगल्सकडून गोलंदाजी करताना अनुज वाल्मिकी आणि विराज टकले यांनी प्रत्येकी ३, तर सोहम कुलकर्णीने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एनजीसीए ईगल्स संघाने २६.१ षटकांत ८ बाद २१८ धावा करत विजय मिळवला. ईगल्सकडून अनुज मुंदडाने ८५, श्रवण मेत्रेने ३८, आर्यन हंगेने २४, पार्थ राठोडने १६ आणि श्लोक आनंदने १३ धावा केल्या. लॉईन्सकडून गोलंदाजी करताना सार्थक कन्ना याने ५२ धावा देत ३ बळी घेतले. सुरज थोरातने ३, तर आर्यन भुमकर आणि आशिष बाबरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. एनजीसीए ईगल्स संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला. या सामन्यात अनुज मुंदडा याला सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज, तर सार्थक कन्ना याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
डीएल मेथडनुसार पँथर्स ५८ धावांनी विजयी
दुसरा सामना एनजीसीए पँथर्स विरुद्ध एनजीसीए रायडर्स यांच्यात झाला. पँथर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत सर्वबाद १७० धावा केल्या. यामध्ये कबीर कीर्तीकर याने ५८, अधिराज कोनापुरे याने ३२ आणि आराध्या आर. याने २० धावा केल्या. रायडर्सकडून गोलंदाजी करताना व्यंकटेश घाडगे याने २२ धावांत ४ बळी आणि स्वप्निल चव्हाण याने १३ धावांत २ बळी घेतले. तर अथर्व हलकुरकी व मल्हार गायकवाड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रायडर्स संघाला २० षटकांत ८ बाद ११२ धावाच करता आल्या. यामध्ये स्वप्निल चव्हाणने नाबाद २७, व्यंकटेश घाडगेने १६ आणि बालाजी रातुलने १५ धावा केल्या. पँथर्स संघाकडून घातक गोलंदाजी करताना अथर्व पाटील याने १३ धावांत ५ बळी आणि शांभवी शिंदकर याने २६ धावांत ३ बळी घेतले. खराब हवामानामुळे हा सामना ‘डीएल मेथड’ (डकवर्थ-लुईस नियम) नुसार पँथर्स संघाने ५८ धावांनी जिंकला. या सामन्यात अथर्व पाटील याला सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज, तर कबीर कीर्तीकर याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
















