
एकादशीनिमित्त पंढरपुरात सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. याची पाहणी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मंगळवारी पंढरपुरात येऊन केली. त्यांनी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
अधिक एकादशीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांना लवकर दर्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचने नुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. या बरोबरच दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. यामुळे घुसखोरीला चाप बसला असल्याचे दिसून येत आहे.
अधिक महिन्यातील एकादशी निमित्त पंढरपुरात सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. आलेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी लुटूत नगरप्रदक्षिणा करुन विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी गोपाळपूर रस्त्यावरील पत्राकडे जाताना दिसत होती. दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तब्बल सात ते आठ तासांचा कालावधी लागत असल्याचे दर्शन रांगेतून दर्शन घेऊनमंदिरातून बाहेर पडलेल्या भाविकांकडून सांगितले जात होते. पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील सहाव्या क्रमाकांच्या दर्शन मंडपापर्यंत गेली असल्याचे दिसून येत आहे. हरी नानाच्या गजराने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान शहरात भाविकांची गर्दी असल्यामुळे मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्गावर पोलिस तैनात करण्यात आलेले दिसत होते. नगरप्रदक्षिणा मार्गावर वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून अनेक बँरेकेडींग उभारण्यात आलेले होते. मोठ्या वाहनांना नगरप्रदक्षिणा मार्गावरुन प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे भाविकांची नगरप्रक्षिणा करताना कोणतीही अडचण होत नव्हती. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगदूगुरु तुकाराम महाराज की जय या बरोबरच माऊली, माऊलींच्या जयघोषाने अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती.



















