सोलापूर – जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता, शिस्त आणि कार्यालयीन व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बुधवारी अभिलेख कार्यालयाला दिलेल्या अचानक भेटीमुळे प्रशासनात खळबळ उडाली. अभिलेख कार्यालयातील अस्ताव्यस्त स्थिती, धूळ खात पडलेली कागदपत्रे, तुटके साहित्य आणि निष्क्रिय व्यवस्थापन पाहून दोन्ही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महत्त्वाची कागदपत्रे जतन करण्यासाठी अभिलेख कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीत लोखंडी कपाटे, तुटलेल्या खुर्च्या, जुन्या फाइल्सचे गठ्ठे आणि अडगळ स्वरूपातील साहित्य मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे दिसून आले. अनेक कागदपत्रांचे गठ्ठे कोणतीही योग्य वर्गवारी न करता ठेवण्यात आल्याने अभिलेख व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, अध्यक्ष वैद्य आणि उपाध्यक्ष पवार यांनी अभिलेख कार्यालयाची पाहणी केल्यानंतर थेट सामान्य प्रशासन व अर्थ विभाग गाठत तेथील कागदपत्रांची तपासणी केली. अर्थ आणि प्रशासन विभागातील संवेदनशील दस्तऐवज तिजोरीत ठेवण्यात आले असून त्या व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी केली. महत्त्वाच्या नोंदी सुरक्षित असल्या तरी कार्यालयीन व्यवस्थापनात आवश्यक ती शिस्त आणि नियोजन नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
दरम्यान, दहा वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झालेल्या कागदपत्रांची नियमानुसार विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना अनेक जुने गठ्ठे अजूनही पडून असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कार्यालयीन जागेचा प्रश्न निर्माण होत असून महत्त्वाच्या नोंदी शोधणेही अवघड होत असल्याचे सांगितले जाते.
कोट
“अभिलेख कार्यालयातील जुनी लोखंडी कपाटे आणि निकामी साहित्य तातडीने भंगारात काढावे. तसेच अनावश्यक कागदपत्रांची नियमांनुसार विल्हेवाट लावून कार्यालय स्वच्छ आणि शिस्तबद्ध करावे,” असे स्पष्ट निर्देश अध्यक्ष वैद्य आणि उपाध्यक्ष पवार यांनी प्रशासन विभागाला दिले.
चौकट
जिल्हा परिषदेमध्ये सुरू झालेल्या या अचानक तपासणी मोहिमेमुळे विविध विभागांमध्ये धावपळ सुरू झाली असून, कार्यालयीन अभिलेख व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Post Views: 31