सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती सप्ताह अंतर्गत शुक्रवारी आयोजित काव्यमैफिलीमध्ये मुंबईचे लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. विविध छटांच्या कविता, ओव्या, समकालीन विषयांवरील मुक्त विचार आणि मनाला भिडणारे काव्यपंक्तींचा वर्षाव करत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. अहिल्यादेवी जयंतीनिमित्त उद्या (शनिवारी) सकाळी आठ वाजता सोलापूर शहरातील नार्थकोट मैदान ते अहिल्यादेवी पुतळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी कविता ही फक्त अभिव्यक्ती नसून समाजाचे विवेक जागृत ठेवणारी शक्ती आहे, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी साहित्यसंस्कृतीकडे तसेच राष्ट्रभक्तीकडे वळले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लोककवी प्रशांत मोरे यांनी आई, प्रेम, निसर्ग, सामाजिक प्रश्न, आत्मसंघर्ष आणि आशावाद अशा विविध विषयांवर आधारित कविता सादर केल्या. त्यांच्या प्रभावी आवाजात व गेय लयीत मांडलेल्या कविता रसिकांच्या मनात भावस्पर्शी ठसा उमटवून गेल्या. काही निवडक कविता सादर करताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट उसळला. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.
Post Views: 11