बालविवाह होत असल्याचे कळविल्याच्या संशयावरुन एकास बेदम मारहाण करुन केले गंभीर जखमी
मंगळवेढा : गणेशवाडी येथे दोन बालविवाह होत असल्याची तक्रार केल्याच्या संशयावरुन एका 25 वर्षीय तरुणास बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी सुभाष इंगोले, रोहित इंगोले,रघुनाथ इंगोले, सुरेश भोसले,दिपक इंगोले,माया इंगोले या सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी रवी शामराव भोसले (रा.गणेशवाड) हे एका खाजगी कंपनीत बेंगलोर येथे नोकरीस असून दि.5 मे रोजी एसआरपी भरती संभाजीनगर येथे असल्यामुळे फिर्यादी भरतीसाठी आले होते. मैदानी चाचणी देवून फिर्यादी हे दि.6 मे रोजी घरी आले. दि.21 मे रोजी डवरी समाजातील अल्पवयीन दोन मुलींचे लग्न होते. सदरचे लग्न असलेबाबत कोणीतरी कळविले होते. त्याचा संशय आरोपींना फिर्यादीवर होता. त्यामुळे दि.22 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता संजय सिताराम जगताप (रा.माळशिरस) व तानाजी चौगुले (रा.बलवडी) या दोघांनी बोलवले होते. त्या प्रमाणे फिर्यादीची आई,वडिल,बहिण व दोन चुलत भाऊ व मोठे काका जगन्नाथ भोसले असे सर्वजण माणगंगा पेट्रोल पंपाजवळ दादाराव भोसले यांच्या घराजवळ गणेशवाडी येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी तुम्ही लग्नाबाबत तक्रार केली होती का? असे विचारले तेव्हां फिर्यादीने आम्ही तक्रार केलेली नाही,आमचे 10 लाखाचे नुकसान झाले आहे ते तुम्ही द्या असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादीने आम्ही काही केलेले नाही असे सांगत असताना आरोपींनी शिवीगाळी,दमदाटी करत हातातील कशाने तरी डोकीत मारुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादीच्या डोकीतून रक्त येवू लागले. तुला सोडत नाही,खल्लास करतो असे म्हणून फिर्यादीच्या कुटूंबाला धमकी दिली. भांडणे फिर्यादीचे आई,वडिल सोडवत असताना सर्वांनी मिळून त्यांनाही बेल्टने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पोलीसांनी अद्यापही आरोपीला अटक केली नसल्याची लेखी तक्रार फिर्यादीने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे करुन न्याय मागीतला आहे.
———————
मुढवी येथे मोटर सायकलवर आलेल्या 8 ते 10 लोकांनी एकास पहाटे घरात घुसून केली मारहाण
मंगळवेढा – मुढवी येथे पहाटे 3.15 वाजता मोटर सायकलवर आलेल्या 8 ते 10 लोकांनी घरात घुसून घराबाहेर ओढून हातपाय बांधून मोटर सायकलवर नेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अनिकेत गायकवाड (रा.मंगळवेढा),अजित कोळेकर,दत्तात्रय ठेंगील व अन्य व्यक्तीविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी चंद्रकांत कदम (रा.मुढवी) हे दि.23 मे रोजी पहाटे 3.15 वाजता घरात झोपले असता घरासमोर 5 ते 6 मोटर सायकली व 8 ते 10 लोक आले होते. मोटर सायकलच्या आवाजाने व कुत्र्याच्या आवाजामुळे यातील फिर्यादी व फिर्यादीची पत्नी जागे झाले. यावेळी उपस्थित लोकांनी घराचा दरवाजा ढकलून सर्वजण घरात घुसून फिर्यादीस घरातून बाहेर ओढत आणले व फिर्यादीचे हायपाय बांधू लागले फिर्यादीने आरडाओरडा केला. त्यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून नेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी यातील अनिकेत गायकवाड याने फिर्यादीच्या पँटच्या खिशातील 7 हजार रुपये जबरीने काढून घेतले व आरोपी म्हणाले याला बॉसकडे घेवून जावूया,आम्ही सर्व बॉसची माणसं आहोत,तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून शिवीगाळ केली. ओरडण्याचा आवाज ऐकून घराशेजारील दगडू कदम,गोरख कदम,प्रज्वल गायकवाड हे घटनास्थळी धावून आले. यावेळी मोटर सायकलस्वार मोटरसायकली घराच्या समोर टाकून ऊसातून पळून गेले. एका मोटर सायकलचा क्रमांक फिर्यादीस दिसला त्याने तो क्रमांक पोलीस स्टेशनला 112 वर कॉल करुन माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीसगाडी आली व पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असल्याचे कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार विक्रांत कोळी हे करीत आहेत.





















