बार्शी – शहरातील तेलगिरणी चौक परिसरात एका २६ वर्षीय युवकास शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय गणेश आदमिले (वय २६, रा. जयशंकर मिल, बार्शी) हे दि. २६ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास तेलगिरणी चौक येथे उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे अकबर सय्यद, युनुस सय्यद आणि युनुस सय्यद यांचा भाऊ (नाव समजू शकले नाही), सर्व रा. मांगडे चाळ, बार्शी हे तेथे आले.
तक्रारीनुसार, “तू येथे कशासाठी आला आहेस?” असा जाब विचारत संबंधितांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवीगाळ करु नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन अकबर सय्यद याने हातातील लाकडी काठीने विजय आदमिले यांच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच युनुस सय्यद व त्याच्या भावाने त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी नागरिक जमा होऊ लागल्यानंतर संबंधितांनी तेथून निघून जाताना पुन्हा परिसरात आल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेनंतर विजय आदमिले यांना त्यांचे मित्र गणेश अनिल चांदणे यांनी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर उपचारासाठी ते बार्शी येथील हिरेमठ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी विजय आदमिले यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकबर सय्यद, युनुस सय्यद आणि युनुस सय्यद यांचा भाऊ (नाव अज्ञात), (सर्व रा. मांगडे चाळ, बार्शी) यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 13