बार्शी – शहर व तालुक्यातील गुटखा माफियांचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. अवघ्या १२ दिवसांपूर्वी २८ लाख रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिलाल शब्बीर तांबोळी हा अद्याप फरार असतानाच त्याच्यावर गुटखा विक्री व साठवणुकीप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दि. १७ मे २०२६ रोजी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा यांनी स्वतः धडक कारवाई करत बिलाल शब्बीर तांबोळी व सरफराज शरीफ बागड यांच्या गोडाऊनवर छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित गोडाऊन सील करण्यात आले होते. मात्र या कारवाई नंतरही मुख्य आरोपी फरार राहिले.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही बिलाल तांबोळी याचा गुटखा व्यवसाय बंद न पडता अधिक जोमाने सुरु असल्याचे आता उघड झाले आहे. वैराग पोलिसांनी केलेल्या ताज्या कारवाईत त्याचे नाव पुन्हा समोर आले असून त्याच्यावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैराग येथील निंबाळकर गल्लीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दि. २९ मे रोजी रात्री ७.३० वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलीस अंमलदार गणेश कानिफनाथ चव्हाण व त्यांच्या पथकाने आरोपी अयाज मुहम्मद मुलाणी यांच्या घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ८७ हजार ९२० रुपयांचा माल जप्त केला. यामध्ये विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला तसेच बादशहा गुटखा यांचा समावेश आहे.
या प्रकरणी अयाज मुहम्मद मुलाणी (वय ३०, रा. निंबाळकर गल्ली, वैराग) आणि बिलाल शब्बीर तांबोळी (रा. बार्शी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट –
गुटखा माफियायाचे जाळे मजबूत —
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. २८ लाख रुपयांच्या कारवाई नंतरही मुख्य आरोपी फरार राहून गुटख्याचा व्यवसाय कसा सुरु ठेवू शकला? त्याला संरक्षण किंवा मदत कोणाकडून मिळत होती का? स्थानिक स्तरावर त्याचे जाळे किती मजबूत आहे? अशा चर्चांना नागरिकांमध्ये उधाण आले आहे.
गुटखा विक्रीच्या माध्यमातून तरुणाई, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मोठ्या कारवाईनंतरही आरोपीने पुन्हा तोच व्यवसाय सुरु ठेवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल पेठकर यांनी केली असून, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कंगले पुढील तपास करत आहेत. फरार आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.
Post Views: 7