सोलापूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अंमलबजावणी अंतर्गत, नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सोलापूर महानगरपालिका स्तरावर मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. ही पुस्तके आगामी १ जून ते १० जून २०२६ या कालावधीत सकाळी आणि दुपारच्या दोन सत्रात बीटनिहाय वितरीत केली जाणार आहेत. यंदा इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वी या चार वर्गांचा नवीन अभ्यासक्रम सुरू होत असल्याने या वर्गांचे पुस्तक वाटप विशेष महत्त्वाचे ठरणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी दिली.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने या संपूर्ण वितरण प्रक्रियेचे नियोजन जाहीर केले असून, सर्व माध्यमांच्या शाळांना दिलेल्या वेळापत्रकानुसारच पुस्तके ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे काटेकोर पालन; विनाअनुदानित आणि शिल्लक पुस्तके वजा होणार, यंदा पुस्तक वाटप करताना पारदर्शकता राखण्यासाठी युडायस २०२५-२६ ची विद्यार्थी संख्या, मागील वर्षाची शिल्लक व पुनर्वापरासाठी उपलब्ध पुस्तके आणि विनाअनुदानित तुकड्यांची संख्या वजा करूनच निव्वळ मागणीनुसार पुस्तके दिली जातील. पुस्तके घेण्यासाठी येताना शाळांना युडायस स्टुडन्ट रिपोर्ट कार्ड, मूळ मागणी पत्र आणि शाळेचा मुख्याध्यापकांचा शिक्का आणणे अनिवार्य आहे.
पाठ्यपुस्तकाचे वितरण सोमवार, दिनांक १ जून ते १० जून २०२६ या कालावधीत सकाळी १०-३० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ६, जोडबसवण्णा चौक, सोलापूर. या ठिकाणी होणार आहे. पुस्तके ताब्यात घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक उपस्थित राहू न शकल्यास, त्यांनी अधिकृत अधिकार पत्र दिलेला जबाबदार शिक्षक प्रतिनिधीच पाठवावा. त्याशिवाय पुस्तके सुपूर्द केली जाणार नाहीत. सध्या पावसाळी वातावरण असल्याने पुस्तके वाहून नेताना ती भिजणार नाहीत, याची पूर्ण दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. पुस्तके सुरक्षित नेण्यासाठी शाळांनी स्वतःची पोती, सुतळी आणि आवश्यक मनुष्यबळ सोबत आणण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
शाळेच्या पहिल्याच पुस्तकांचे वितरण
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्यात शिक्षणाचा उत्साह वाढवण्यासाठी ‘समारंभपूर्वक’ पुस्तक वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता पालक संघ आणि स्थानिक शिक्षणप्रेमी नागरिकांना सन्मानाने निमंत्रित करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. पुस्तक वाटपानंतर शिक्षकांना चार प्रतींमध्ये पोहोच याद्या तयार कराव्या लागणार असून, तपासणी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान त्या सादर कराव्या लागणार आहेत.
समग्र शिक्षा’चा शिक्का मारण्यास बंदी
पुस्तके ही ‘झेब्रा क्रॉसिंग’ प्रकारची (विशेष ओळख असलेली) असल्याने, त्यावर पूर्वीप्रमाणे ‘समग्र शिक्षा’ किंवा ‘सर्व शिक्षा अभियान’चा शिक्का मारता येणार नाही. पुस्तकांवर केवळ संबंधित शाळेचाच अधिकृत शिक्का मारावा लागणार आहे. वाटप केलेली संख्या आणि मिळालेली पुस्तके यात तफावत आढळल्यास तात्काळ समायोजन करून शिल्लक पुस्तके मनपा कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.
Post Views: 19