सोलापूर : आपले वडील भाई छन्नुसिंह चंदेले यांच्यापासून प्रेरणा, विचार व ध्येयवादाचा वारसा पुढे नेण्याचे काम
ज्येष्ठ नेते हेमू चंदेले करीत आहेत. याशिवाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत नवी पिढी उभी करीत आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी काढले.
येथील ज्येष्ठ नेते हमीरसिंह ऊर्फ हेमूजी चंदेले यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व कार्य गौरव समारंभ रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री अशोक पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, खासदार प्रणिती शिंदे,
माजी आ. प्रकाश यलगुलवार, माजी आ. विश्वनाथ चाकोते, गौतम अरबडे,
प्रा. विलास बेत, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिंदे पुढे म्हणाले की, हेमूजींनी कधीच राजकीय महत्वाकांक्षा ठेवली नाही. निस्वार्थी पद्धतीने ते आपले पिता, थोर स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंह चंदेले यांचा वारसा तसेच सामाजिक समरसतेचा विचार पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सर्वधर्मसमभावाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्यदेखील ते नेटाने करीत आहेत.
यावेळी माजीमंत्री अशोक पाटील म्हणाले की, आज या पक्षातून त्या पक्षात राजकीय कोलांटउड्या मारण्याच्या या जमान्यात हेमू चंदले यांच्यासारखे व्यक्ती हे निश्चितच अपवाद आहेत. भाई छन्नुसिंह चंदेले यांचा मोठा वारसा त्यांना लाभला आहे. राजकीय लालसा न ठेवता त्यांनी आपली चळवळ कायम ठेवली आहे.
याप्रसंगी उल्हास पवार म्हणाले की, हेमूजींनी विचार व तत्वांशी कधी तडजोड केली नाही. समर्पित भावनेने ते अविरतपणे काम करीत आले आहेत. माजी आमदार अनंतराव गाडगीळ म्हणाले की, हल्ली राजकारणात तत्व,निष्ठा याची किंमत राहिली नाही. अशा या जमान्यात तत्व,निष्ठा याला तिलांजली न देता गरिबांना ज्ञानदान तसेच इतर कार्याच्या माध्यमातून ऊब देण्याचे महत्त्वपूर्ण काम हेमू चंदेले करीत आहेत.
या कार्यक्रमात हेमू चंदेले व सविता चंदेले या दांपत्याचा सुताचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास नामदेव भगत, सुधीर खरटमल, प्रा.डॉ.रोझा चंदेले, डॉ. पायल चंदेले, रुस्तम कंपली, अमृतदत्त चिन्नी, तुळशीदास जव्हेरी, सुनील दावडा, नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये, सूत्रसंचालन अंबादास शिंदे यांनी तर आभार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी मानले.
चौकट
देश उभारणीतील काँग्रेसचे योगदान तरुणांना माहीत नाही.
सत्काराला उत्तर देताना हेमू चंदेले म्हणाले की, आमच्या कुटुंबाची ओळख ही काँग्रेस, गांधी-नेहरू-इंदिराजी यांचे विचार याच्याशी निगडीत आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी आंदोलनातील सहभागामुळे मी सक्रिय राजकारणात आलो. स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर देशाच्या उभारणीत काँग्रेसने दिलेले योगदान तरुणांना माहित नाही. देश स्वतंत्र झाला,त्यावेळी कोणत्याही सुविधा नव्हत्या. तेव्हापासून काँग्रेसने देशाच्या कल्याणाकडे लक्ष दिले. भीषण दुष्काळ अशा प्रसंगांना सक्षमपणे सामोरे जाताना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, सक्षम लष्कर आणि भक्कम आर्थिक स्थिती अशा प्रगतीकडे देशाला काँग्रेसने नेले. कठीण काळात देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना काँग्रेसने सक्षमपणे केल्याचे आम्ही नव्या पिढीला सांगू शकलेलो नाही. ते आता सांगावे लागेल.
Post Views: 9