बार्शी – शहरातील अभिजीत देशीदारु हॉटेल परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तीन अज्ञात व्यक्तींनी लबाडीने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण गोवर्धन नांदवटे (सेवानिवृत्त शिक्षक) हे मंगळवारी सकाळी कपडे आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. दुपारपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा प्रज्योत नांदवटे यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता अभिजीत देशीदारु हॉटेलच्या व्यवस्थापकाने त्यांना त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली.
यानंतर प्रज्योत नांदवटे व त्यांचे मित्र निखील ढावारे हे संबंधित ठिकाणी पोहोचले असता कल्याण नांदवटे हे हॉटेलबाहेरील कट्ट्यावर बसलेले दिसून आले. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, काही वेळापूर्वी तीन अनोळखी व्यक्ती आपल्या संपर्कात आल्याचे आणि त्यांच्याचकडून चैन चोरीस गेल्याचा संशय असल्याचे कल्याण नांदवटे यांनी सांगितले.
संशयितांपैकी एकाने राखाडी रंगाचा टी-शर्ट व काळी जिन्स, दुसऱ्याने पांढरा टी-शर्ट व निळ्या रंगाच्या फुलांची डिझाईन असलेले वस्त्र तसेच निळी जिन्स, तर तिसऱ्याने फिकट पांढऱ्या रंगाचा चौकडीचा हाफ शर्ट व काळी पॅन्ट परिधान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यात सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व १ ग्रॅम वजनाचा बदाम असा एकूण १६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
Post Views: 5