सोलापूर : नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी गुरुवारी अक्कलकोट रोड परिसरातील नीलम नगर, नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर तसेच मुद्रा सन सिटी परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, नगरसेविका सारिका खजूरगी, नगर अभियंता सारिका आकूलवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुनील फुलारी, महेश येमूल, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव, चिंतारे, चंद्रकांत गुंडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मागील पावसाळ्यात या भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. याची दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा निचरा, अडथळे तसेच पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी वज्रेश्वरी नगर व मुद्रा सन सिटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांचीही पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पूर्ण झालेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेत पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहून जाण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले.
महापौर कोंड्याल यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
Post Views: 6