
जालना – शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा पत्रकार संतोष विष्णु भुतेकर यांना घरासमोर अडवून दोन अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे लावण्यात आली आहेत.
पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, २ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास संतोष भुतेकर हे आपल्या निवासस्थानाजवळील कार्यालयातील काम आटोपून पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर गेले होते. मयुरी रेसिडेन्सी परिसरातील घरासमोरील रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसम आले. फिर्यादीनुसार, दोघांनी भुतेकर यांची कॉलर पकडून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तू पत्रकार आहेस, जास्त शहाणा होऊ नकोस. तू सतत गुटखा प्रकरणांच्या बातम्या प्रसिद्ध करतोस, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, असे म्हणत एका आरोपीने त्यांच्या पाठीला बंदुकीसारखी वस्तू लावली आणि याच बंदुकीने तुला उडवून टाकू, अशी धमकी दिली.
यावेळी भुतेकर यांच्या हातातील पाळीव कुत्रा आरोपींच्या दिशेने धावून गेल्याने आरोपी घाबरले. त्यानंतर एका आरोपीने बंदुकीच्या मागील भागाने भुतेकर यांच्या डाव्या हातावर प्रहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तुला बघून घेतो, अशी धमकी देत दोघे घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर भुतेकर यांनी तातडीने चंदनझिरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२) (मारहाण), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३(५) (सामूहिक कृत्य) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ आणि महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत महिपतराव कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पत्रकाराला लक्ष्य करून धमकी देण्यात आल्याने पत्रकार संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांवर हल्ले करून सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धडा शिकवावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. शहरातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.





















