बार्शी – तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या ८ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या मालापैकी ५.५ सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिखर्डे येथील शेतकरी राहुल प्रभाकर उकीरडे (वय ४१) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ४ जून रोजी उकीरडे कुटुंब शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असताना त्यांच्या घरी आजी गंगुबाई या एकट्याच होत्या. दुपारी १-३० वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती घरात आला. त्याने स्वतःची ओळख नात्यातील व्यक्ती म्हणून करुन देत वृद्ध महिलेशी संवाद साधला आणि पाणी मागितले.
महिला पाणी आणण्यासाठी घरात गेल्यानंतर आरोपीने संधी साधून घरातील कपाटाची चावी मिळवली. त्यानंतर कपाट उघडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. संध्याकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. तपासा दरम्यान पोहेकॉ.सचिन माने, पोकॉ.तानाजी लोकरे, पोकॉ.बळी बेंद्रे, पोकॉ. संगम लढले यांनी आरोपी बापू लक्ष्मण झोंबाडे (वय ४०, रा. चिखर्डे, ता. बार्शी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडून चोरीची कबुली मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ३ तोळे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी गंठण, १ तोळा ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस तसेच ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बिंदली असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मालाचा शोध सुरु असून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकलीचाही तपास सुरु आहे.
या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात कलम ३०५(अ) व ३३२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांकडून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी आरोपीस १० जूनपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
Post Views: 20