टेंभुर्णी – ग्रामीण भागातील महिलांनीही क्रिकेटसारख्या खेळांमध्ये पुढाकार घेऊन मैदानात उतरावे. युवकांप्रमाणेच महिलांसाठीही क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांमुळे महिलांना एकत्र येण्याची, आपले कौशल्य दाखविण्याची आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आगामी काळात टेंभुर्णी शहरात महिलांसाठी स्वतंत्र क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांनी केले.
टेंभुर्णी येथे आयोजित पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोनियाताई गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. महिलांसाठी क्रिकेट सामने आयोजित केल्यास आपण स्वतःही त्यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांनाही क्रीडा क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टेंभुर्णी येथे दि. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बोबडे यांच्या नियोजनातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी क्रिकेटप्रेमी, युवक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती ॲड. अमृताताई वाघे, रत्नमाला बोबडे, मोनिका बोबडे, सई बोबडे, ऋषिकेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाघे, बाळासाहेब ढगे, ऋतुराज सावंत, मोहनराव बोबडे, महेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी वैभव देशमुख, राम पवार, रोहित ढवळे, टेंभुर्णी भाजप युवक मोर्चा अध्यक्ष संजसिंह शेंडे,गीरीष तांबे,भजनदास खटके, शहाजी गायकवाड,बारस हवालदार, शांतीलाल कुटे , सयाजी देशमुख, अर्जुन साळवे, सज्जन पवार,टेंभुर्णी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिकेश बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून टेंभुर्णी परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, महिलांसाठीही स्वतंत्र क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याच्या सोनियाताई गोरे यांच्या आवाहनामुळे महिला क्रीडा सहभागाचा विषय चर्चेत आला आहे.
Views: 8