सोलापूर – महाराष्ट्रातून दुधातील भेसळ पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यापक मोहीम हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील ग्राहकांना निर्भेळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच गुणवत्तापूर्ण दूध उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याची भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केली.
राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंढे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी राज्यातील दूध व्यवसायासमोरील आव्हाने, भेसळीचे प्रकार, तपासणी यंत्रणा आणि दूध उत्पादकांच्या हिताच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.दूध भेसळीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी दूध पावडर प्रकल्प, पाऊच पॅकिंग उद्योग आणि दुग्ध प्रक्रिया क्षेत्रातील संस्थांची संयुक्त बैठक जून महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. राज्यात कुठेही भेसळयुक्त दूध मिळते, अशी प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. बनावट पनीरविरोधात विभागाने केलेल्या कारवाईचेही त्यांनी कौतुक केले. या कारवाईमुळे शुद्ध दुधापासून तयार होणाऱ्या पनीरला बाजारपेठेत अधिक मागणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंढे यांनी स्पष्ट केले की, भेसळ रोखण्यासाठी तपासण्या, धाडी आणि दोषींवर कारवाईची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येईल. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. शुद्ध दूध पुरवठ्याची विश्वासार्ह साखळी निर्माण झाल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराच्या स्वरूपात मिळेल.
दरम्यान, राज्यात दूध दर घसरल्याच्या काळात
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याचा निर्णय मुंढे दुग्धविकास विभागाचे सचिव असताना घेण्यात आला होता. त्या निर्णयामुळे लाखो दूध उत्पादकांना थेट आर्थिक दिलासा मिळाल्याची आठवण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी करून दिली.
Post Views: 18