जालना : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या Periodic Labour Force Survey (PLFS) आणि Annual Survey of Unincorporated Sector Enterprises (ASUSE) या दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांना जालना जिल्ह्यात शुक्रवार, 12 जूनपासून प्रारंभ झाला आहे. जून 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत ही सर्वेक्षणे जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, रोजगार, बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रासंबंधीची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणांची सुरुवात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपआयुक्त सुचित कुलकर्णी, सांख्यिकी अधिकारी संजय घोडके तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विकासात्मक धोरणांसाठी उपयुक्त ठरणार माहिती
भारत सरकारतर्फे नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणांद्वारे देशातील रोजगार व बेरोजगारीची स्थिती, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची सद्यस्थिती, रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि आर्थिक घडामोडींची माहिती संकलित केली जाते. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य शासन विविध विकासात्मक योजना, रोजगारविषयक धोरणे, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच आर्थिक नियोजनाची आखणी करत असते.
PLFS सर्वेक्षणातून रोजगारस्थितीचे चित्र स्पष्ट होणार
Periodic Labour Force Survey (PLFS) या सर्वेक्षणाद्वारे देशातील रोजगार व बेरोजगारीचे प्रमाण, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार, वेतनधारक रोजगार तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील श्रमबाजाराची स्थिती याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि सामाजिक-आर्थिक धोरणे अधिक प्रभावीपणे तयार करण्यास मदत होणार आहे.
ASUSE मधून असंघटित क्षेत्राचा आढावा
Annual Survey of Unincorporated Sector Enterprises (ASUSE) या सर्वेक्षणाद्वारे असंघटित क्षेत्रातील उत्पादन (Manufacturing), व्यापार (Trade) आणि सेवा (Services) क्षेत्रातील उद्योग आस्थापनांची संख्या, रोजगार, उत्पादनक्षमता, स्थूल मूल्यवर्धन (GVA), उत्पन्न तसेच इतर आर्थिक निर्देशांकांची माहिती गोळा केली जाणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचा मोठा वाटा असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाचा अचूक आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या सर्वेक्षणातून प्राप्त होणारी माहिती राज्य व जिल्हास्तरीय उत्पन्नाचे अंदाज तयार करण्यासाठी तसेच विविध विकास निर्देशांक निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात 120 नमुना घटकांची निवड
जालना जिल्ह्यात PLFS सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील 48 व शहरी भागातील 24 असे एकूण 72 नमुना घटक निवडण्यात आले आहेत. तर ASUSE सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील 16 आणि शहरी भागातील 32 असे एकूण 48 नमुना घटक निश्चित करण्यात आले आहेत. निवडलेल्या नमुना घटकांमध्ये प्रशिक्षित प्रगणक व पर्यवेक्षकांकडून नमुना पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडलेल्या कुटुंबांना तसेच उद्योग आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतीद्वारे आवश्यक माहिती गोळा करणार आहेत.
जिल्हा प्रशासन व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने नागरिक, व्यावसायिक आणि उद्योग आस्थापनांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अचूक व आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. या सर्वेक्षणांमधून मिळणारी माहिती राज्य आणि देशाच्या विकास नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.















