सोलापूर : विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय कौशल्यांना चालना देऊन त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्याच्या उद्देशाने वालचंद शिक्षण समूहाच्या वतीने ‘उद्यमदीप’ ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालचंद आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत उद्यमशील मंचाच्या माध्यमातून मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर ते गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी होणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता मध्य रेल्वेचे सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. सुजीत मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे सर्व विश्वस्त तसेच समूहातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यापुरते मर्यादित न राहता वर्तमान आणि भविष्यकाळातील गरजा ओळखून स्वतःमधील कौशल्ये विकसित करावीत, व्यवसायाच्या संधी शोधाव्यात आणि उद्योजक बनून स्वावलंबी व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या एक्स्पोमध्ये अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
**दिवाळीच्या खरेदीसाठी विविध वस्तूंची पर्वणी!**
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या एक्स्पोमध्ये पणत्या, आकाशकंदील, विविध सजावटीचे साहित्य, दिवाळी फराळाचे पदार्थ, मसाले, कपडे आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. सर्व वस्तू एकाच छताखाली माफक दरात उपलब्ध होणार असल्याने सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दिवाळीच्या खरेदीची एक चांगली संधी मिळणार आहे.
**विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव**
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ वस्तुनिर्मितीच नव्हे, तर वस्तूंचे सादरीकरण, विपणन, विक्रीकौशल्य, ग्राहकांशी संवाद आणि आर्थिक व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच भविष्यात स्वतःचा उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळणार आहे.
या ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पोला सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची भरभरून खरेदी करून त्यांच्या उद्योजकीय प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा आणि वालचंद आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी केले आहे. या एक्स्पोसाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
*चौकट*:-
* उद्घाटन: मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६
* उद्घाटक: डॉ. सुजीत मिश्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, सोलापूर
* उद्घाटनाची वेळ: सकाळी ९ वाजता
* एक्स्पोची वेळ: सकाळी १० ते रात्री ९
* कालावधी: ३ ते ५ नोव्हेंबर २०२६
* प्रवेश: विनामूल्य
Post Views: 21