सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी सज्ज झाले आहेत. रविवार, १४ जून रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून चार लाखांहून अधिक उमेदवार अर्जदार असल्याची माहिती समोर येत असून केवळ ५५२ पदांसाठी ही चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
या भरती प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ३१०, राज्य कर निरीक्षक २३६ आणि सहाय्यक कक्ष अधिकारी ६ अशा एकूण ५५२ जागांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि संबंधित पदांसाठी आवश्यक शारीरिक चाचणी अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे.
राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातून १३ हजारांहून अधिक उमेदवार परीक्षेला सामोरे जाणार असल्याने परीक्षा केंद्र परिसरात मोठी गर्दी अपेक्षित आहे.
स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात यंदाची ही सर्वाधिक चर्चेतील परीक्षा ठरली आहे. मर्यादित पदसंख्या आणि मोठ्या प्रमाणातील उमेदवार यामुळे स्पर्धेची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये पदसंख्या वाढविण्याची आणि काही संवर्गांमध्ये आरक्षणानुसार जागांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
दरम्यान, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे, वैध मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत ठेवणे, तसेच आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या परीक्षेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, यश मिळविण्यासाठी उमेदवारांचा अंतिम टप्प्यातील अभ्यास आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी लागणार आहे.
कोट
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षित संवर्गातील जागा वाढविण्याची तसेच वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणी करण्यात आली होती. अनेक पात्र उमेदवारांना यामुळे न्याय मिळाला असता. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेप्रमाणेच या परीक्षेची उत्तरसूचीही तातडीने जाहीर करून पारदर्शकता राखावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.
Post Views: 13