बार्शी – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय विवाहित महिलेचा पाठलाग करुन धावत्या दुचाकीवर तिचा विनयभंग केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीसोबत दुचाकीवरुन उपचारासाठी जात असताना एका तरुणाने महिलेच्या साडीचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने १५ जून २०२६ रोजी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता आणि तिचे पती मजुरी करुन उदरनिर्वाह करतात.
रविवार, १४ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजणेच्या सुमारास पीडित महिलेच्या पोटात दुखत असल्याने ती आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन येरमाळा येथे औषधोपचारासाठी जात होती. त्यांची दुचाकी शिराळे ते वाघाचीवाडी रोडवरुन जात असताना, आरोपी निखील वाघ हा त्याच्या लाल रंगाच्या दुचाकीवरुन त्यांच्या पाठीमागे आला.
सुरुवातीला आरोपीने महिलेला अश्लील हातवारे व इशारे केले. महिला पतीसोबत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आरोपीने दुचाकी आणखी जवळ आणून महिलेच्या पाठीवरुन हात फिरवला व तिचा हात धरुन विनयभंग करत साडीचा पदर ओढला.
या अनपेक्षित व धक्कादायक प्रकारामुळे महिला घाबरुन जोरात ओरडली. महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपीने स्वतःची दुचाकी वेगात पळवून तेथून पोबारा केला. पतीने दुचाकी थांबवून विचारपूस केली असता, घाबरलेल्या महिलेने रडत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, हा प्रकार अचानक घडलेला नाही. आरोपी या घटनेपूर्वीही पीडितेच्या घरासमोरुन वारंवार दुचाकीवरुन चकरा मारुन तिला जाणीवपूर्वक त्रास देत होता. तसेच, “जर तू याबद्दल कोणाला किंवा तुझ्या नवऱ्याला काही सांगितले, तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही,” अशी गंभीर धमकीही त्याने महिलेला दिली होती.
सातत्याने होणारा त्रास आणि १४ जून रोजी घडलेल्या विनयभंगाच्या गंभीर प्रसंगानंतर, पीडित महिलेने धैर्याने पांगरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन आरोपी निखील रामलिंग वाघ याच्याविरुद्ध विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पांगरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 5