
सोलापूर – ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार, सन्मानपूर्वक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, मोरवांची येथील प्रार्थना फाउंडेशन वृद्धाश्रमात पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत विशेष भेट व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून वृद्धांच्या आरोग्यविषयक गरजांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील २४ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. वाढत्या वयात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित तपासण्यांचे महत्त्व काय आहे आणि निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व क्षयरोग तपासणीविषयी माहिती देण्यात आली. क्षयरोग निदानासाठी थुंकी तपासणी व एक्स-रे सुविधांची माहिती, तसेच कुष्ठरोग नियंत्रणासाठी होम व्हिजिट उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुष्मान भारत योजना आणि वयवंदना कार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
वृद्धाश्रमातील आरोग्य सुविधांचा आढावा घेताना तेथील सेवा समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ, प्रभावी आणि सातत्यपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे डॉ. घाडगे यांनी सांगितले.
तत्पूर्वी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरापूर येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. औषध भांडार विभागाची तपासणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरुडकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी वाळा यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 21