
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी महोत्सवात क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तर सांस्कृतिक स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पटकाविले.
विद्यापीठाच्या प्रांगणात तीन दिवस रंगलेल्या या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात राज्यातील ५ विद्यापीठांच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या क्रीडा गुणांचे आणि कला कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या सर्व चुरशीच्या लढतींमध्ये तब्बल २२ गुणांची कमाई करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक ने यंदाच्या ‘सर्वसाधारण चषकावर’ आपले नाव कोरले. तर यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने १७ गुणांसह द्वितीय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ८ गुणांसह तृतीय स्थान पटकावले.
या संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पूजा अरुण गवई यांनी क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रथम, वैयक्तिक नृत्यात प्रथम आणि खो-खो स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील मानाचा ‘गोल्डन वुमन’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
——
रस्सीखेच सोलापूर विद्यापीठात विजेतेपद
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या रस्सीखेच स्पर्धेत यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने (धनश्री जाधव, सुप्रिया अनभुले, फैजुन्निसा नाईकवाडी व सहकारी) प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या संघाने द्वितीय, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महिला संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
—–
खोखो स्पर्धेत पुणे विद्यापीठाची बाजी
खो-खो मैदानावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने (शोभा जाधव, शिल्पा राणे व सहकारी) अव्वल स्थान गाठत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या संघाला द्वितीय स्थानावर, तर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
——–
पारितोषिक वितरण समारंभास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉ. प्रभाकर कोळेकर, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अनिल घनवट आदी उपस्थित होते.
सहभागी स्पर्धक पूजा गवई, माधुरी आहेर आणि सुवर्णा खैरनार यांनी मनोगत व्यक्त करताना सोलापूर विद्यापीठाने प्रथमच आयोजित केलेल्या या महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणणारा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथी डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी विद्यापीठ भविष्यातही महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा दर्जेदार स्पर्धा व महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे सांगितले
प्रारंभी क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. डॉ. केदारनाथ काळवणे यांनी आभार मानले.
वैयक्तिक निकाल याप्रमाणे (प्रथम पाच):
रोड रेस: वैशाली हुबे (पुणे विद्यापीठ), राणी भाईदास भिल (राहुरी), गंगा राठोड (गडचिरोली), चंद्रकला बाचकर (नाशिक), सुप्रिया अनभुले (सोलापूर).
बॅडमिंटन (प्रथम तीन) : पूजा अरुण गवई , शैलजा विजय बोंद्रे (पुणे विद्यापीठ), कविता भगवान काकडे (राहुरी ).
सांस्कृतिक : रांगोळी : डॉ. शुभांगी कदम (राहुरी), सुप्रिया अनभुले (सोलापूर), ज्योती इटनकर (नाशिक).
वैयक्तिक गायन चेतना पवार , अमृता खर्डेकर (नाशिक), अनिता भोसले (सोलापूर).
वैयक्तिक नृत्य : पूजा गवई (पुणे), सुवर्णा खैरनार (नाशिक) निलोफर बागवान (सोलापूर).
समूहगीत : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
समूहनृत्य : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.






















