सोलापूर – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एकल महिला सर्वेक्षण-२०२६’मधून जिल्ह्यातील एकल, घटस्फोटित, परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत गावपातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात तब्बल ८६ हजार २२९ एकल महिलांची नोंद झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना प्रशासनाच्या मदतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला व बाल विकास विभागाने यासर्वेक्षणाद्वारे केवळ महिलांची संख्या नोंदविण्यावर भर न देता त्यांना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही, कोणत्या सेवांसाठी मदतीची आवश्यकता आहे आणि त्यांच्या मूलभूत अडचणी कोणत्या आहेत, याचाही सखोल अभ्यास केला आहे.
सर्वेक्षणानुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित असलेल्या महिलांची संख्या ५८ हजार ३५७ इतकी आहे. तसेच ५३ हजार २२० महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी ५२ हजार २४२, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी ४८ हजार ७३ महिलांना सहाय्याची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.
मालमत्ता आणि हक्कांशी संबंधित प्रश्नही मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. तब्बल ३१ हजार ४३९ महिलांना जातीचे प्रमाणपत्र, २६ हजार ४६४ महिलांना जन्म-मृत्यू दाखले, तर २४ हजार १८४ महिलांना मालमत्ता हक्क नोंदणीसाठी मदतीची आवश्यकता असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, बँक खाते, वारस प्रमाणपत्र आणि रेशनकार्डाशी संबंधित अडचणीही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील सर्वाधिक एकल महिलांची नोंद दक्षिण सोलापूर प्रकल्प क्षेत्रात ९ हजार ६२५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ अक्कलकोटमध्ये ९ हजार ५०९, करमाळा येथे ७ हजार २९२, माळशिरस येथे ६ हजार ५६२ आणि बार्शी येथे ६ हजार १३५ महिलांची नोंद झाली आहे. हे सर्वेक्षण भविष्यातील ‘एकल महिला धोरणा’साठी महत्त्वाचा आधार ठरणार असून, विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या महिलांपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासनाला दिशा देणारे ठरणार आहे. जिल्ह्यातील हजारो महिलांच्या हक्क, सन्मान आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
चौकट
सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष
एकूण नोंद झालेल्या एकल महिला : ८६,२२९
लाडकी बहीण योजनेपासून वंचित : ५८,३५७
श्रावणबाळ योजनेसाठी मदतीची गरज : ५३,२२०
वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी मदतीची गरज : ५२,२४२
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी मदतीची गरज : ४८,०७३
जातीचे प्रमाणपत्र आवश्यक : ३१,४३९
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी मदतीची गरज : २६,४६४
मालमत्ता हक्क नोंदणीसाठी मदतीची गरज : २४,१८४
सर्वाधिक नोंद : दक्षिण सोलापूर (९,६२५)
दुसऱ्या क्रमांकावर : अक्कलकोट (९,५०९)
चौकट
२३ जून रोजी एकल महिला धोरण कार्यशाळा
राज्य सरकार स्वतंत्र ‘एकल महिला धोरण’ तयार करत आहे. या धोरणाला अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित स्वरूप देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात २३ जून रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या याकार्यशाळेत एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, अभ्यासक, विषयतज्ज्ञ तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
चौकट
जागतिक विधवा महिला दिन
दि. २३ जून रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी जागतिक विधवा महिला दीन आहे. महिला दिनानिमित्त विधवा महिलांचे विविध प्रश्न मार्गी लागणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Post Views: 12