पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित कवठेकर प्रशालेत एक अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळा पार पडला. निमित्त होते, रोटरी क्लब पुणे यांच्या सीएसआर फंडातून मिळालेल्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण आणि १० वीच्या परीक्षेत यशाचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या २५ विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह झालेला शाही गौरव सोहळा.संपूर्ण कार्यक्रम एवढ्या प्रचंड उत्साहात आणि जोशात पार पडला की, प्रशालेचा परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाचा प्रारंभ संस्थेचे सचिव सु.र.पटवर्धन यांच्या प्रास्ताविकाने झाला. यावेळी त्यांनी रोटरी क्लबने दिलेल्या विविध विद्यार्थ्यांप्रती सोयीसुविधांचा अत्यंत कृतज्ञता पूर्ण उल्लेख केला व या सोयीमुळे कवठेकर प्रशालेचे विद्यार्थी नक्कीच त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शैक्षणिक प्रगती मध्ये फार मोठी शिखरे सर करतील अशी आशाही व्यक्त केली.
ज्येष्ठ रोटरीयन अमेय धोत्रे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती रोटरी क्लबची असलेली आपुलकी व जिव्हाळा याचा विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले व भविष्यामध्ये याहीपेक्षा जास्त योगदान आपण या प्रशालेसाठी देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे व पाषाण यांच्या दातृत्वातून साकारलेल्या तब्बल ९ लाख रुपयांच्या अत्याधुनिक व नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर रोटरी क्लब पुणे पाषाण यांनी प्रशालेला सोलार प्लांट आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वॉटर सॉफ्टनर विद्यार्थ्यांसाठी भेट दिला होता त्याचे ही उद्घाटन यावेळी करण्यात आले.
या नव्या सुविधांमुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पंखांना आता आधुनिक विज्ञानाचे नवे बळ मिळणार असल्याचे सांगुन प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र भंडारकवठेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानामालक कवठेकर, सचिव सु.र.पटवर्धन, संस्था सदस्य डॉ. मिलिंद जोशी, एस. पी. कुलकर्णी आणि रोटरी क्लब पुणे व पाषाणचे सर्व खंदे शिलेदार व पदाधिकारी तसेच कवठेकर प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
——————
चौकट : ( राजुरकर बंधुंच्या अथक प्रयत्नामुळेच शक्य)
रोटरी क्लब पुणे व पंढरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा साधणारे पुणे रोटरीचे प्रांतपाल धनंजय राजुरकर व प्रशालेतील त्यांचे ज्येष्ठ बंधू शिक्षक चंद्रशेखर राजुरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे या कार्यास मूर्त स्वरूप मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
——————
चौकट : ( रोटरी क्लब पुणे व पाषाणच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान)
अमेय धोत्रे, सौ प्राजक्ता जेरे (प्रांतपाल पुणे रोटरी क्लब, पुणे ), हेमंत जेरे, मिलिंद ग्रामोपाध्ये, सतीश सातारकर, सचिन अमडेकर, विवेक रत्नाळीकर व दीपा पानसे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आले.
———————
चौकट : ( दहावीतील गुणवंतांचे सत्कार )
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेमध्ये प्रशालेतून यश मिळवलेल्या सुमारे राज्यात प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांचे व ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेतउपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक शाही फेटा, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
Post Views: 10