बार्शी – येथील एका पाईप उत्पादन करणाऱ्या व्यवसायिकाकडून १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे पी.व्ही.सी. पाईप घेऊन त्याचे पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहीर भागवत सावंत (वय ४३, रा. सुभाषनगर, बार्शी) यांची बार्शी येथे २००८ पासून ‘श्री दत्त प्लास्टिक’ नावाची पाईप बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांचा सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (रा. विद्यानगर) येथील व्यापारी राजेश बाळासाहेब गायकवाड यांच्याशी २०२५ पासून व्यावसायिक संबंध होते. १ एप्रिल २०२५ ते ८ एप्रिल २०२५ दरम्यान आरोपी राजेश गायकवाड याने फिर्यादी सावंत यांच्याकडून १८० एम.एम. चे १०० नग पी.व्ही.सी पाईप खरेदी केले होते. हा माल पिकअप गाडीद्वारे आरोपीला पोहोच करण्यात आला होता. या मालाची एकूण किंमत १ लाख ६२ हजार रुपये एवढी होती.
मालाची डिलीव्हरी मिळाल्यानंतर फिर्यादी सावंत यांनी जेव्हा पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपी गायकवाड याने आज देतो, उद्या देतो असे म्हणत सातत्याने टाळाटाळ केली. फिर्यादीने मित्र आणि चालकासह प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरुन वारंवार संपर्क साधूनही पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाहीर सावंत यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
Post Views: 9