सोलापूर – पावसाळा सुरू होऊनही सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम असल्याने शाळांच्या वेळांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून तापमान सातत्याने ३७ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान राहिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तात्पुरत्या स्वरूपात सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी शासनाकडे केली आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने राज्यातील अनेक भागांप्रमाणे सोलापूरमध्येही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळा पत्र्याच्या इमारतींमध्ये भरत असल्याने दुपारच्या सत्रात वर्गखोल्यांमधील तापमान अधिक वाढते. त्यातच काही भागांत सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या अडचणींमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी प्रथमच इतक्या ठळकपणे पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने यासंदर्भात शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले असून, ३० जूनपर्यंत सकाळचे सत्र लागू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनीही विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.आता वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल होणार का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संघटनांच्या मागणीची दखल घेत शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
चौकट
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण, थकवा, चक्कर येणे आणि उष्माघाताचा धोका वाढू शकतो. तसेच अनेक ग्रामीण भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याची गरज संघटनांनी अधोरेखित केली आहे.
कोट
जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून तापमान जास्त जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांनी शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात शासन स्तरावरून लवकरच निर्णय होईल.
– कादर शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
Post Views: 11