अकलूज – माळशिरस व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र या संघटनेच्या व संतवीर ह भ प बंडातात्या कराडकर यांचे मार्गदर्शनाखाली मातृतीर्थ सिंदखेडराजा ते पाचाड अशी सुमारे चौदा दिवसांची पायी पदयात्रा मोहीम आयोजित केली असून या मोहिमेत शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघांचे मार्गदर्शक श्री प्रमोद भापकर यांनी केले आहे. 25 जून ते 9 जुलै 2026 या कालावधीत ही मोहीम होणार असून दररोज किमान 35 की. मी. पायी चालत ही पदयात्रा राष्ट्रमाता जिजाऊ यांचे समाधीस्थळ पाचाड जि. रायगड या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे पुण्यतिथी दिवशी पोहचणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून गडकिल्ले मोहीम व अनेक साहसी मोहीम आयोजित केल्या जातात या अगोदर आग्रा ते राजगड सुमारे 1400 की मी ची पायी मोहीम त्याच बरोबर संगमेश्वर जि. रत्नागिरी ते तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शक्ती ज्योत शौर्य यात्रा, किल्ले पन्हाळगड ते विशालगड या पायी मोहिमा आयोजीत केल्या असून या मोहिमांना युवकांच्या मधून उस्पुर्त प्रतिसाद लाभत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत आऊसाहेब जिजाऊ यांचा मार्गदर्शनाचा अनमोल वाटा असून ज्या मातेने आपल्या पोटी या स्वराज्याचे निर्माते घडविले त्यांचे जन्मागांव सिंदखेडराजा जि. बुलढाणा या ठिकाणाहून प्रथमच ही पायी पदयात्रा होत असून या मोहिमेत सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, या जिल्ह्यातील व्यसनमुक्त युवक सहभागी होणार आहेत.ही पदयात्रा सिंदखेडराजा, जालना, गाडे जळगाव, छावणी संभाजीनगर, गणेशवाडी, कांगोणी फाटा, अहिल्यानगर, सुपे, रांजणगाव, वाघोली, गोऱ्हे, वेल्हे, मढेघाट वाकी व पाचाड असा प्रवास असून सुमारे चौदा दिवस ही पदयात्रा असणार आहे. वेल्हापासून पुढे ही पदयात्रा डोंगराळ पाऊलवाटेने जाणार असून मढेघाटातून खाली रायगड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या वेळी प्रत्येक गावातून नास्ता, भोजन आयोजित केले असून प्रत्येक गावातील ग्रामस्थ या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे माजी अध्यक्ष श्री शहाजी काळे,आनंदराव निकम,दिपक जाधव, नवनाथ मालुसरे, संजय पराडे, महादेव यादव,बाळासो कासारे, श्री प्रा मारुती शेळके, भानुदास वैरट, शरद रायते, समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.
Post Views: 10