सोलापूर – राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदललेल्या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ दिवसांचा ‘सेतू अभ्यास’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपक्रम पूर्ण करण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.
नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाढलेल्या शैक्षणिक पातळीशी जुळवून घेणे, भाषिक आकलन विकसित करणे तसेच स्व-अभ्यासाची सवय निर्माण करणे या उद्देशाने हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमातील संकल्पना, क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्यांमधील दरी कमी करून विद्यार्थ्यांचा शिकण्याचा प्रवास अधिक सुलभ करण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या २१ दिवसांत नियोजनबद्ध पद्धतीने सेतू अभ्यास पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. यासाठी विशेष पुस्तिका तयार करण्यात आल्या असून त्या राज्यातील सर्व शाळांना हार्ड कॉपी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या पुस्तिका ऑनलाइनही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचे मूल्यमापन करून त्यानुसार अध्यापनाची दिशा ठरवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेणे अधिक सोपे होणार असून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
चौकट
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने प्रादेशिक विद्या प्राधिकरणांचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भातील सूचना पाठविण्यात आल्या आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत ‘सेतू अभ्यास’ हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.
Post Views: 9