बार्शी – शहरातील अलिपूर रोड येथील माऊली चौक परिसरात धारदार लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास बार्शी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब श्रीमंत होरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. २१ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डायल ११२ नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी आलेल्या कॉलच्या अनुषंगाने पोलीस पथक माऊली चौक, अलीपूर रोड परिसरात दाखल झाले.
पोलीस कॉन्स्टेबल होरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल माने, साळवे व शहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पारधी कॅम्प परिसरात एक संशयित युवक थांबलेला दिसून आला. त्याच्याकडे नाव व पत्त्याची विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव प्रविण अशोक शिवशरण (वय २१, रा. त्रिमूर्ती चौक, उपळाई रोड, बार्शी) असे सांगितले.
दरम्यान, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार लोखंडी कोयता आढळून आला. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी संबंधित तरुणास ताब्यात घेत कोयता जप्त केला व पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले.
तपासादरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) अन्वये दि. १० जून ते २४ जून २०२६ या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू केले असल्याने, या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने धारदार शस्त्र बाळगल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
Post Views: 12