
वरुडा : शासकीय कृषी महाविद्यालयाच्या ‘ विद्यार्थी- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत’ (RAWE) कृषीकन्या वरुडा गावात दाखल झाल्या असून, त्या आगामी काळात गावातील शेतकरी, महिला बचत गट व युवकांसाठी विविध कृषीविषयक जनजागृती व मार्गदर्शन उपक्रम राबविणार आहेत.
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती व शासकीय योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या प्रतिक्षा हारकर, योगिता आनेबोईनवाड, सुचिता शिंदे, श्रेया गायकवाड,पद्मजा तवले, संस्कृती गायकवाड, रोहिणी झोंबाडे, नेहा पायल आणि आकांक्षा मुळे या विद्यार्थिनी गावात विविध कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन करणार आहेत.
शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. डी. एस. पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता साबळे, लालासाहेब देशमुख,कार्यक्रम समन्वयक डॉ. किरण थोरात व डॉ. राघवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे.
या कालावधीत माती परीक्षणाचे महत्त्व, मृदा आरोग्य पत्रिका, सुधारित बियाणे, जैविक शेती, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय तसेच विविध शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे कृषीकन्यांना प्रत्यक्ष कृषी क्षेत्रातील अनुभव मिळणार असून, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे. कृषीकन्यांच्या आगमनाचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले असून, या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.





















