पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी वाखरी येथील आयुष्मान आरोग्य उपकेंद्रात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात केली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडे, डॉ. सुडके, डॉ. आगावणे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय मिळवू दरवेळी” हा संदेश देत प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यंदाच्या मोहिमेत जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५७२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरात ६ हजार ५१३ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून ७ हजार २२२ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मोहिमेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.