सोलापूर – आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. मंदिर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत आणि दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी-भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्री गोरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पाहणी करून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. मंदिर विकास आराखड्यांतर्गत पूर्ण झालेल्या कामांसह आगामी टप्प्यातील कामांची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. विकासकामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिराच्या जतन, संवर्धन आणि विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती पालकमंत्र्यांना दिली. भाविकांच्या सुविधा वाढविणे, मंदिर परिसराचे संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवत विकासकामे करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्रींची मूर्ती आणि उपरणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुविधा, सुरक्षा आणि विकासकामांचा समतोल साधत भाविकांना सुरळीत दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला असून, मंदिर परिसरातील प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा दक्षतेच्या सूचना दिल्या.
Post Views: 35