
अक्कलकोट – मौजे पितापूर येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश मीडियम शाळेने शिक्षण क्षेत्रात आणखी एक अभिनव पाऊल टाकत अबॅकस क्लासेसची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अबॅकस शिक्षण सुरू करणारी ही पहिलीच शाळा ठरल्याचा मान पितापूर शाळेला मिळाला आहे.
विद्यार्थ्यांची गणितातील गती वाढावी, स्मरणशक्ती, एकाग्रता, तार्किक विचारशक्ती आणि आत्मविश्वास विकसित व्हावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
यावेळी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामस्थ निजाम सगरी, शुकूर सगरी, सद्दाम सगरी, दुल्हेसाब सगरी, शिक्षक गुलशन हरकारे, तमन्ना गोलंदाज, मौला मुदेल, तस्कीन नल्लामंदू यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अबॅकस शिक्षण हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असून त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले.
पितापूर जिल्हा परिषद सेमी इंग्लिश मीडियम शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असून, राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांनाही या उपक्रमातून प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






















