सोलापूर – संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापूर शहरातून समाधान आणि भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शासन, न्यायव्यवस्था आणि पोलिस यांचे नागरिकांनी आभार मानत हा निर्णय न्यायाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
“लेकीच्या अश्रूंना आज न्याय मिळाला,” अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजमन हेलावले होते. त्यामुळे न्यायालयाच्या कठोर निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सोलापूरची नात मानल्या जाणाऱ्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची वेदना कधीही विसरता येणार नाही, असे सांगताना नागरिकांनी संतापही व्यक्त केला. काहींनी आरोपीला जाहीरपणे सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची मागणी करत अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
महिलांवरील आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय समाजासाठी धडा ठरणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अशा नराधमांना कोणतीही दया दाखवू नये.मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर शिक्षा हीच खरी प्रतिबंधक उपाययोजना आहे,”अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.नसरापूर प्रकरणातील हा निकाल पीडित कुटुंबासाठी न्यायाचा आणि समाजासाठी दिलासाचा क्षण मानला जात आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेता अमोल शिंदे, नगरसेवक सात्विक बडवे, समाधान आवळे, प्रकाश अवस्थी, राजु आलूरे, सागर पिसे, विनोद मोटे, जय मस्के, आयुब पठाण, प्रभाकर गायकवाड, वैभव जवळकोटे, अक्षय बिद्री, अनिता गवळी, रुपाली वाडेकर, दीनानाथ जाधव, राहुल गोयल, विनय ढेपे, बाळासाहेब पवार, शिवाजी गावडे, प्रवीण खरात, ओंकार शुक्ला आदी उपस्थित होते.




















