सोलापूर – नसरापूर प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालाचे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी उभा राहणारा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अमृता वाघे म्हणाल्या की, या निकालाने महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात समाजाला कठोर संदेश दिला आहे. अशा अमानुष कृत्यांना कोणतीही माफी नसून, कायद्याच्या चौकटीत दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजात कायद्याविषयी विश्वास वाढेल आणि अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक मुलीला सुरक्षित आणि भीतीमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शासन, न्यायव्यवस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी संवेदनशील भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.
नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडितांना न्याय मिळू शकतो, हा विश्वास अधिक दृढ झाला असून महिला आणि बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाल्याचेही अमृता वाघे यांनी नमूद केले.
Post Views: 11