मोहोळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्या कार्य क्षेत्रामध्ये मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याला कायदेशीर हरकत नोंदवत मोहोळ तालुका पूर्वी प्रमाणे सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन घाडगे व रामलिंग महामुनी यांनी महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनामध्ये मोहोळ तालुक्याची भौगोलिक रचना, प्रशासकीय सोयी, नागरिकांचा दैनंदिन शासकीय कामकाजाचा प्रवास तसेच सोलापूर येथे उपलब्ध असलेली सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील नागरिकांचे महसूल, न्यायालयीन, शासकीय व इतर प्रशासकीय कामकाज प्रामुख्याने सोलापूर येथे होत असल्याने कार्य क्षेत्रात कोणताही बदल झाल्यास नागरिकांना अनावश्यक आर्थिक, वेळेचा व प्रशासकीय त्रास सहन करावा लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले.
याचा विचार करूनच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही घाडगे व महामुनी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना या विषयाचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून योग्य निर्णय घेण्याबाबत सूचित केल्याची माहिती निवेदन कर्त्यांनी दिली.
याबाबत कोणता अंतिम निर्णय होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.