अक्कलकोट – आजच्या धावपळीच्या जीवनात ध्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. कामाचा ताण, चिंता, नैराश्य आणि अस्थिर जीवनशैली यांमुळे अनेकांना मानसिक त्रास जाणवतो. अशा वेळी दररोज काही मिनिटे ध्यान केल्यास मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचार आणि एकाग्रता वाढते, असे प्रतिपादन प्रख्यात कर सल्लागार ओंकारेश्वर उटगे यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कै पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आयोजित केलेल्या ध्यान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, विद्याधर गुरव, दत्तात्रय कटारे, संतोष जवळगे, मल्लिनाथ सलगर, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व दिगंबर जगताप उपस्थित होते.
यावेळी विद्याधर गुरव म्हणाले की, ध्यानाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो, नियमित ध्यानामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीरातील थकवा कमी होतो. त्यामुळे शरीर आणि मन यांच्यात समतोल निर्माण होतो.
दत्तात्रय कटारे म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, व्यावसायिक तसेच ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येकासाठी ध्यान उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात काही वेळ ध्यानासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवन जगणे अधिक सुलभ होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिगंधा सोमेश्वर यांनी केले, सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
ध्यानाचे फायदे आत्मसात करा
मनशांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, आनंदी व समाधानी जीवन, अभ्यासात एकाग्रता हे ध्यानाचे फायदे आहेत ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे ध्यान प्रशिक्षक ओंकारेश्वर उटगे यांनी सांगितले.
फोटो ओळ
पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात ध्यान करताना विद्यार्थी
Post Views: 25