माढा : माढा भूमी अभिलेख कार्यालय व माढा नगरपंचायत यांच्या दिरंगाई कारभारा विरोधात माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला शेकडो नागरिक उपस्थित होते. या आंदोलनामुळे जवळपास एका तासापेक्षा जास्त वेळ मुख्य चौकातील वाहतूक ठप्प झाली होती.

यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी संबंधित दोन्ही कार्यालयास निवेदन देऊन रस्ता रोकोचा इशारा दिला होता. त्या निवेदनात असे म्हटले आहे की माढा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा गैरकारभार सुरू असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक, मानसिक व वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयात सातत्याने कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थिती नसतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व इतर कामे विनाकारण लांबवली जाऊन त्यांची आर्थिक पिळवणूक होते. तसेच दलाला मार्फत आलेली कामे मात्र प्राधान्याने व लवकर केली जात असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धट व अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून येते व कार्यालयातील कागदपत्रे बाहेरील व्यक्तींकडून हाताळली जात असल्याची बाब अत्यंत गंभीर असून याची तात्काळ चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.तसेच नगरपंचायतीस दिलेल्या निवेदनात माढा बार्शी रोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात हायमास्ट दिवा बसवण्यात यावा ही प्रमुख मागणी केली होती. त्या पूर्ण न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलन स्थळी भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संबंधित शेतकऱ्यांचे कामे वेळेत मार्गी लावू व कार्यालयातील कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. नगरपंचायत अधिकाऱ्यांनी हायमास्ट दिव्या संदर्भात लागणाऱ्या परवानग्या घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत माढा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.