मंगळवेढा – सध्या खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे कालवा व नदीकाठची पिके धोक्यात आली असून, उजनी धरण सध्या 50% पर्यंत भरल्याने उजवा व डावा कालव्यासह भीमा नदीपत्रात देखील पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे उपस्थित होते. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत देखील निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात आज अखेर अतिशय कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे चालू स्थितीत खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला. शेतकऱ्यांना पाण्याअभावी ऊस व फळबागा जोपासणे देखील जिकरीचे झाले.
त्यासोबत भीमा नदीपात्र देखील गेल्या दोन महिन्यापासून कोरडे असून नदीकाठचा शेतकरी अडचणीत आलेला आहे. पाणी नसल्याकारणाने पिके जळून जात आहेत. सध्याची उजनीची परिस्थिती पाहता धरणात समाधानकारक साठा असून नदीवर अवलंबून अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना यामध्ये माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहर या शहरांचा व जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा समावेश असल्याने सदरील योजना देखील सुस्थितीत चालण्यासाठी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी केली.
Post Views: 17