पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून निरा भाटघर उजवा कालवा (NRBC) द्वारे पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रात तात्काळ पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा पाच तास वाढविण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून शुक्रवारपासून त्याच्या अंमलबजावणस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील गंभीर पाणीटंचाईची वस्तुस्थिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदनाद्वारे आमदार समाधान आवताडे यांनी निदर्शनास आणून दिली होती. वीर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निरा भाटघर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून सुमारे ६ हजार क्युसेक पाणी निरा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी निरा नरसिंगपूरमार्गे भीमा नदीत मिसळून पुढे कर्नाटकाच्या दिशेने वाहून जाणार असल्याने त्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
आवताडे यांनी निवेदनात नमूद केले होते की, पंढरपूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी केवळ दोन तास वीजपुरवठा मिळत असल्याने नदीतील पाणी उचलणे शक्य होत नाही. परिणामी पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीची चिंता अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे नदीत उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी किमान आठ तास वीजपुरवठा देणे आवश्यक आहे.
तसेच वीर धरणातील वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांसाठी एनआरबीसी (NRBC) कालव्याद्वारे तात्काळ पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात होणार असून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठाही वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या निर्णयामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर करता येणार असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————-
चौकट- पंढरपूर तालुक्यातील गंभीर पाणीटंचाईची वस्तुस्थिती कर्तव्यदक्ष आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निदर्शनास आणून दिली होती. याची तात्काळ दखल घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिल्याने पंढरपूर तालुक्यास कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले असून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार पाच तास वीजपुरवठा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Post Views: 38