पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी संतमहात्म्यांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असून, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विट्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने १६ जुलैपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन खुले केले आहे. दर्शन रांगेतील भाविकांना अन्नदाना बरोबरच आरोग्य तपासणीची देखील सुविधा दर्शन मंडपाच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेद्र शेळके यांनी दिली.
यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेत सुमारे ३० लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे.
शहरातील गोपाळपूर रोडवर पावसाचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यत बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, जेणेकरून दर्शन रांगेमध्ये घुसखोरी होणार नाही. दर्शन रांगेमध्ये भाविकांना तीन वेळा अन्नदान करण्यात येणार आहे. दर्शन रांगेत कुलर व पंख्यांची सोय करण्यात आली असून, विश्रांती कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. तसेच एखाद्या भाविकाला त्रास होत असल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य पथक देखील तैनात ठवण्यात आले आहे. दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठलाचे लाईव्ह दर्शनही मिळणार आहे. पंढरपुरात आलेले भाविक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू खरेदी करतात. त्यामुळे हा लाडू गुणवत्तापूर्ण बनविण्यात येणार आहे.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण तयारी केली आहे. सुमारे ३० लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत असल्याने भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रांगेमध्ये विश्रांती कक्षांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री.शेळके यांनी सांगितले. आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन येत्या १६ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.
Post Views: 15