बार्शी – शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डी.बी. पथक) अत्यंत तत्परता आणि कौशल्य दाखवत शनिवार आठवडा बाजारातील मोबाईल चोरीच्या मालिकेचा छडा लावला. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे मोबाईल लंपास करणाऱ्या बीड जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले चारही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ११ जुलै रोजी सकाळीच्या सुमारास संभाजीनगर, रेल्वे स्टेशन रोड येथील लक्ष्मण शामराव लांडगे हे कुटुंबासह शनिवार आठवडा बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आले असता त्यांच्या खिशातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. त्याचवेळी बाजारात आलेल्या आणखी तीन नागरिकांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत बीड जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन गोरख इटकर (रा. वडारवाडा, बार्शी नाका, जि. बीड) आणि अण्णा शिवाजी इटकर (रा. राजुरी, ता. व जि. बीड) यांचा समावेश आहे. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून फिर्यादींचे चोरीस गेलेले मोटोरोला, व्हिवो व ओप्पो कंपनीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४५ हजार रुपये आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्यासह डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
आठवडा बाजार किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपले मोबाईल, पाकीट व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ‘डायल ११२’ वर माहिती द्यावी.
Post Views: 14