सोलापूर – पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊन जुलै महिन्याचा मध्य उलटत आला तरी दक्षिण सोलापूर तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने दुष्काळाची छाया अधिक गडद होत आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर खरीप पेरणी केली असली, तरी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक भागांत अधूनमधून मुसळधार पाऊस होत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असून सोयाबीन, तूर, मका, बाजरी व इतर पिकांच्या उगवणीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
अपुऱ्या पावसाचा परिणाम केवळ खरीप पिकांपुरता मर्यादित नसून फळबागा आणि भाजीपाला पिकांवरही होऊ लागला आहे. डाळिंब, पपई, पेरू आदी फळबागांसह टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी यांसारख्या भाजीपाला पिकांना नियमित पाण्याची आवश्यकता असते. मात्र विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांतील पाणी कमी झाल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची तसेच आर्थिक नुकसान होण्याची भीती बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील सीना नदी, लहान-मोठे तलाव, ओढे आणि अनेक विहिरींमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. काही ठिकाणी जलस्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर असून भूजल पातळीतही घट होत असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्याच वर्षी अतिवृष्टीमुळे सीना नदीला मोठा पूर आला होता. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अवघ्या एका वर्षात परिस्थिती पूर्णपणे बदलली असून यंदा पावसाच्या प्रतीक्षेत नदीपात्र ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, हवामानातील वाढती अनिश्चितता पाहता जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दक्षिण सोलापूरसारख्या कमी पर्जन्यमानाच्या भागात दीर्घकालीन जलव्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची मागणी नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.
चौकट : शेतकऱ्यांसमोरील प्रमुख चिंता
१) खरीप पिकांच्या उगवणीवर परिणाम; दुबार पेरणीचे संकट
२) फळबागा व भाजीपाला पिकांना पाण्याचा तुटवडा
३) विहिरी, बोअरवेल व जलस्रोतांची पाणीपातळी घटली
४) जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न; उत्पादन खर्च वाढण्याची भीती
Post Views: 21