सोलापूर : शासनाच्या विविध योजना निधींतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ९ कामांच्या निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेशास मंजुरीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या मालकीची एक जागा भाडेकराराने देण्याचा प्रस्तावही समितीसमोर ठेवण्यात आला असून, शुक्रवार दि. १७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे.

सोलापूर महापालिका स्थायी समितीची बैठक सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान २०२५-२६ अंतर्गत विविध प्रभागांतील रस्ते, गटारी, पिण्याच्या पाईपलाईन, समाज मंदिर, व्यायामशाळा आणि सभा मंडप उभारणीसह अनेक विकासकामांच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याची प्रत्येकी ३४ लाख २८ हजार रुपयांची दोन कामे, प्रभाग ८ मधील कविता नगर गेट ते कुचन हायस्कूल गेट परिसरातील ३३ लाख रुपयांचे डांबरीकरण, सफाई कामगार वसाहतीतील चितळेश्वर मंदिर येथे समाज मंदिर व मड्डी वस्तीतील नवीन व्यायामशाळेसाठी ८३ लाखांची कामे, विविध प्रभागांतील १८ ठिकाणी ३ कोटी २४ लाखांचे रस्ते, २६ ठिकाणी ३ कोटी ३८ लाखांचे रस्ते, नीलम नगर एमआयडीसी गंगा चौक परिसरातील ७३ लाखांच्या गटारी, होटगी रोडवरील कर्मचारी वसाहतीत ३१ लाखांचे सभा मंडप, शहरातील १४ ठिकाणी १ कोटी ६५ लाखांचे काँक्रिटीकरण, तसेच सिद्धेश्वर नगर भाग-४ व सहारा नगर भाग-२ मध्ये ४७ लाखांचे रस्ते काँक्रिटीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मक्तेदारांना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे. मंजुरीनंतर विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पार्क चौकातील जागा भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव चर्चेत
दरम्यान, महापालिकेच्या मालकीच्या जागा भाडेकराराने देण्यासंदर्भातील प्रस्तावांना पुन्हा सुरुवात झाली आहे. पार्क चौक परिसरातील खादी ग्रामोद्योग भवनासमोरील इंडो-तिबेटियन मार्केटलगतची मोकळी जागा भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. संबंधित जागा अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याने ती नियमानुसार भाडेकराराने देण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी झेरॉक्स, टायपिंग, जनरल स्टोअर आदी व्यवसाय सुरू करण्याचा मानस प्रस्तावात नमूद करण्यात आला आहे. यापूर्वी जागा वाटपाच्या प्रस्तावांवरून मोठी चर्चा झाल्यानंतर पुन्हा असा प्रस्ताव समोर आल्याने महापालिका वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.
Post Views: 17