पंढरपूर – आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आपल्या होडीतून चंद्रभागेची सफर घडवून आणण्यासाठी येथील कोळी बांधवांची आपल्या होड्या सज्ज करण्यासाठी लगबग सुरु असल्याचे दिसत आहे. येथील कोळी समाजातील सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही होडी व्यवसायावरच अवलंबुन आहे.
आषाढी,कार्तिकी तसेच इतर यात्रांच्या काळात येथे लाखों भाविक दाखल होत असतात. विठ्ठलाचे दर्शन घेवून चंद्रभागेची होडीतून सफर करण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. येथील कोळी बांधव आजही होडी व्यवसाय करुन आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवितात. यात्रांच्या काळात चंद्रभागेला पुरेशा प्रमाणात पाणी असेल तरच या कोळी बांधवांना होडी व्यवसायामधून चार पैसे मिळतात. येथे येणारे भाविक होडीतून चंद्रभागेच्या पात्रात असणाऱ्या विष्णूपद तसेच गोपाळपूर पर्यंत जाणे पसंत करतात
होडीतून चंद्रभागेच्या विष्णूपद मंदिरा जाण्यासाठी एका भाविकाला पन्नास ते साठ रुपये द्यावे लागतात. साधारणपणे होडी व्यवसाय करणारी सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबे आजही येथे कार्यरत आहेत. या कुटुंबांचा मुख्य व्यवसाय होडी चालविणे हाच असतो. त्यामुळे यात्रांच्या काळात चार पैसे मिळावेत यासाठी अगोदर पासूनच कोळी बांधवांची होडीच्या डागडुजी करण्याची कामे सुरु असतात. काही कोळी बांधव खास आषाढी यात्रेच्या अगोदर आपल्या जुन्या झालेल्या, मोडकळीस आलेल्या होड्या मोडून नवीन होड्या देखील तयार करीत असतात. यात्रांच्या काळात जुन्या होड्या पेक्षा नवीन होड्यांमधून चंद्रभागेची सफर करण्यास वारकरी भाविकांची जास्त पसंती असते. वारकरी, भाविक कुटुंबियां समवेत होडीतून सफर करीत असताना अगदी नदीपात्रात फोटोसेशन देखील करीत असतात. काही हौशी भाविक होड्या चालविणाऱ्या कोळी बांधवांच्या जागेवर बसून स्वत: होड्या चालवित असल्याचे देखील फोटो काढून घेत असल्याचे येथील होडी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांकडून सांगितले जाते.
———————————
चौकट : ( नवीन होडीसाठी एक ते दीड लाखाच्या आसपास खर्चे )
साधारणपणे एक नवीन होडी तयार करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाखाच्या आसपास खर्च येतो. पाण्यात जास्त कालावधीत टिकून राहण्यासाठी दर्जेदार सागवान लाकडाच्या फळ्यांचा तसेच लाकडांचा होडी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. जुन्या सागवाना लाकडापासून फळ्या तसेच लाकूड काढून टिकाऊ होड्या बनविल्या जातात. होड्यांची बांधणी करण्यासाठी लोखंडी खिळ्या ऐवजी तांब्याच्या किंवा पितळी खिळ्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. कारण लोखंडी खिळ्यांना लवकर गंज लागतो. त्यामुळे या खिळ्यांच्या ताकद कमी होऊन होड्या कमकुवत होत असतात. मात्र तांब्याच्या किंवा पितळी खिळ्यांना गंज लागत नाही. त्यामुळे असे खिळे महाग जरी असले तरी त्यांचा खास होड्या तयार करण्यासाठी वापर केला जातो. एक होडी तयार करण्यासाठी सलग काम केले तर महिना ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या येथील कोळी बांधवांची जुन्या होड्यांच्या डागडुजी बरोबरच नवीन होड्यांची कामे पुर्ण करण्याची लगबग दिसून येत आहे.
—————————–
चौकट : ( आकर्षक घोड्यांचा मुखवटा )
होडीच्या पुढील बाजूस घोड्याच्या मुखवट्या मुळे होड्यांच्या रुबाबदारपणात चांगलीच भर पडत असते. होडीच्या लांबीवर घोड्याच्या मुखवट्याची उंची अवलंबून असते. होड्यांच्या घोड्याचे मुखवटे तयार करण्यासाठी देखील सागवान लाकडाचाच वापर केला जातो. सागवानावर केलेली कलाकुसर अधिक ठळकपणे दिसत असल्याने घोड्यांच्या मुखवट्यासाठी सागवान लाकडाचा खास वापर केला जातो.
Post Views: 20