सोलापूर – जिल्हा परिषदेला १५व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या सुमारे ८५ कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपाचे सूत्र निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांसाठी ६०:४० टक्क्यांचा फॉर्म्युला चर्चेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांना तुलनेने अधिक निधी मिळण्याची शक्यता असून, विरोधकांच्या वाट्याला कमी निधी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांच्या यादीनुसार निधीवाटपाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर विभागीय आयुक्तांची मंजुरी घेतली जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष निधीवाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर ऑगस्टअखेरपर्यंत सदस्यांना विकासकामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभा तसेच विविध विषय समित्यांच्या बैठकीत सदस्यांकडून निधीवाटपाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य सुविधा आणि अन्य मूलभूत कामांसाठी निधीची प्रतीक्षा असल्याने सदस्यांचे लक्ष आता अंतिम आराखड्याकडे लागले आहे.
चौकट
२५ कोटी शाळा-आरोग्यासाठी
१५व्या वित्त आयोगातून मिळालेल्या ८५ कोटी रुपयांपैकी सुमारे २५ कोटी रुपये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्याचे नियोजन आहे. उर्वरित निधीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
चौकट
समान वाटपाची मागणी
आषाढी वारीच्या कालावधीतही निधीवाटपाच्या मुद्द्यावर काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सत्ताधारी असो वा विरोधक, सर्व सदस्यांना समान निकषाने निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ६०:४० चे सूत्र प्रत्यक्षात लागू झाल्यास त्यावर विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट
अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार निधीवाटपाचा कोटा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आराखडा तयार करीत आहे. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि प्रत्येक सदस्याच्या वाट्याला नेमका किती निधी येणार, याचे आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे ६०:४० च्या चर्चित फॉर्म्युल्यामुळे सदस्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमही कायम आहे.
कोट
निधीवाटपास संदर्भात वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहेत. मात्र सदस्यांच्या विकास कामांच्या याद्या प्रशासनास प्राप्त झाले आहेत. विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर निधी वाटपाचे नियोजन केले जाईल.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
कोट
१५ वा वित्त आयोग आणि विकास निधी याबाबत अद्याप पर्यंत चर्चा झालेली नाही. मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर निधी वाटपाचे ठरवले जाणार आहे. सदस्यांच्या कामाच्या याद्या प्राप्त झाले आहेत.
– इंद्रजित पवार,.उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 11