सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन पार्श्वभूमीवर सुनीलनगर येथील महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशाला येथे वारकरी संप्रदायाची परंपरा जपत अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात शालेय पालखी व दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष करत परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थाध्यक्ष शंकर चौगुले, संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले तसेच संचालक नागराज चौगुले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती व सुशोभित पालखीच्या पूजनाने झाली. आरतीनंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी नीळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दिंडीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून पारंपरिक संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले.
मुलांनी पांढरी टोपी, सदरा-धोती, हातात टाळ-मृदंग आणि भगवी पताका धारण केली होती, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि काहींनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन रुक्मिणीमातेचे रूप साकारले. ‘माझे माहेर पंढरपूर’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या अभंगांनी व भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला सुनीलनगर परिसरातून निघालेल्या या दिंडीत बाल वारकऱ्यांनी फुगड्या, हरिनाम आणि विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





















