टेंभुर्णी – टेंभुर्णी येथील श्री माऊली शिक्षण संस्थेत आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक उत्साहात बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते पालखी पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसेच वारकऱ्यांच्या विविध वेशभूषा परिधान करून बालदिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक वेशभूषा आणि भक्तिभावाने ओतप्रोत सादरीकरणाने उपस्थित पालक व नागरिकांची मने जिंकली.
बालदिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग, ओव्या, गवळणी, भारुडे आणि भक्तिगीते सादर करत वारकरी परंपरेची ओळख करून दिली. टाळ, चिपळ्या आणि भगव्या पताका हातात घेऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्य, स्वच्छता, साक्षरता आणि सामाजिक ऐक्य यांचा संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृतीही केली. त्यामुळे ही बालदिंडी केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारी ठरली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरेबद्दल आदर, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत संस्थेच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे आणि सचिवा सुरजाताई बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेतील शिक्षकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
Post Views: 17