सोलापूर : आसरा चौक परिसरातील एसबी प्लाझा येथे दूषित पाण्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तिन्ही नमुन्यांचा अहवाल समाधानकारक आला आहे. तिन्ही नमुने पिण्यास योग्य असल्याचे स्पष्टीकरण
महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिले आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा सुरक्षित असून एसबी प्लाझामधील खासगी बोअर बंद करण्याच्या सूचना रहिवाशांना देण्यात आल्या आहेत, असे चौबे यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारीनंतर एसबी प्लाझा परिसरातील ड्रेनेज लाइनची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे ३३० मीटर लांबीची नवीन ड्रेनेज लाइन टाकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या कामास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ड्रेनेज लाइनमधील सांडपाणी रिव्हर्स होऊन ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मिसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर एसबी प्लाझा येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणी अहवालानुसार टाकीतील पाणी पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post Views: 33