सोलापूर – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय संपादन केल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता तथा राज्यसभा खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सत्कार सोहळा पार पडला.
प्रास्ताविक करताना त्यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्या तब्बल तीन कार्यकाळांतील उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तदनंतर सोलापूर बारचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख यांनी ॲड. मिलींद थोबडे यांच्या अष्टपैलू कायदेशीर कारकिर्दीचा व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले. या विशेष प्रसंगी सोलापूर विधी क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व नामांकित वकिलांनी आपले विचार मांडले.
यामध्ये ॲड. शरद पाटील, ॲड. मंगला चिंचोळकर, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. डी. एन. भडंगे, ॲड. संजीव सदाफुले आणि ॲड. अमोगसिद्ध साखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “ॲड. मिलिंद थोबडे यांनी नेहमीच नवोदित वकिलांना पाठीशी घातले आहे. राज्यातील वकिलांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी त्यांनी बार कौन्सिलमध्ये बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे,” असा सूर सर्व वक्त्यांच्या भाषणातून उमटला.
सत्काराला भावूक उत्तर देताना ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले की, “सोलापूरच्या वकील वर्गाने आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून सोलापूरच्या संपूर्ण विधी क्षेत्राचा विजय आहे. भविष्यातही वकिलांच्या कल्याणासाठी आणि न्यायालयाच्या बळकटीकरणासाठी मी कटिबद्ध राहीन.”
यानंतर कार्यक्रमात पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी अध्यक्षीय भाषण केले. ॲड. मिलींद थोबडे यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांनी सोलापूर बार असोसिएशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मनोज पामुल व ॲड. मलसिद्ध देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पाहुण्यांचे, उपस्थित वकील बंधू-भगिनींचे आभार बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी मानले.
या दिमाखदार सोहळ्याच्या मंचावर ॲड. मिलिंद थोबडे यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी सुचिता थोबडे उपस्थित होत्या तसेच मंचावर सोलापूर बार असोसिएशनच्या सहसचिवा ॲड. मीरा प्रसाद यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, महिला वकील, नवोदित वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















